मुंबई | बेळगावमध्ये ‘कन्नड रक्षण वेदीके’ सारख्या संघटनांकडून महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक वाद चांगलाच पेटला आहे. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आज (6 डिसेंबर) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. यावरून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, “एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?”, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
“कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगित करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे”, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं!”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.