“हे बेईमानाचं सरकार असून…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | Aditya Thackeray On Shinde Government – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशनाला सामोरे जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना डिवचले आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला. शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना विरोधक आणि शिवसैनिकांनी ‘आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणाबाजी केली आहे. याच दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. यावेळी गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचं पोस्टर झळकावण्यात आलं. तसंच आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असं देखील ते म्हणाले.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या संस्कृतीत, राजकारणात याआधी गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?, मुख्यमंत्री किंवा खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

मी काही राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना याचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून, महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. जनतेला धमकावणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील, तर यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो असंही आदित्य म्हणाले.

Sumitra nalawade: