मुंबई : (Aditya Thackeray On rebels MLA) शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे आणि शिवसेनेचा वाद आता न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालावर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, खरा वाघ पळून जात नाही. आसाममध्ये तळ ठोकलेल्या आमदारांना त्यांनी कैदी म्हटलं आहे. ठाण्यात राहून एकनाथ शिंदे यांच्यात बंड करण्याची हिंमत नव्हती. म्हणून ते आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान पुढे बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले, आमदारांनी मुंबईत यावे आणि माझ्या डोळ्यात बघून आमचे काय चुकले ते सांगावे. जे गद्दारी करतात, ते कधीच जिंकत नाही. हा आमचा विश्वास आहे आणि आम्हाला सध्या सामान्य जनतेचा खूप आशिर्वाद मिळत आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले. महाराष्ट्राचा राजकीय पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
ते निष्ठावंत कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, जीव गेला तरी चालेल पण शब्द जाऊ देऊ नका. जे पळून जातात ते कधीच विजयी होत नाहीत हा शिवसेनेचा इतिहास आहे. न्यायालयाचा निर्णय आता वाचावा लागेल. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आमदारांना पुढे यावे लागेल. हे राजकारण नव्हे तर सर्कस झाली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य हे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात महत्त्वाची भूमिका बजावत असून, बंडखोरांना तोंड देण्यासाठी नविन रणनीती आखत असल्याची माहिता मिळत आहे.