“हे सर्व जगजाहीर…”, संजय राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई | Aditya Thackeray’s First Reaction On Arrest Of Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यभरात शिवसैनिक संतप्त झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. तसंच शिवसेनेसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही राजकीय सुडापोटी कारवाई केली असल्याचा आरोप केला आहे. या दरम्यान, शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (1 ऑगस्ट) चिपी विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा कोकणात पोहचली आहे. ते शिवसेना बंडखोर आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा मतदारसंघ असलेल्या सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत मेळावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावर पोहचल्यावर पत्रकारांनी त्यांना राऊतांच्या अटकेविषयी विचारले. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे.”

“हे सर्व एक दीड महिन्याचं आहे, तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम सुरू केलं तेव्हा पहिलं काम कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही.”

Sumitra nalawade: