४ हजार पोलिस राहणार तैनात
पुणे : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालखी सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे २२ जून रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून या पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्ताचे खास नियोजन करण्यात आले असून, संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू येथून २० जूनला, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथून २१ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत.
दरम्यान, २२ जून रोजी सायंकाळी या दोन्ही पालख्यांचे शहरात आगमन होणार आहे, तर २३ जून रोजी पालखीचा शहरात मुक्कामी असणार आहे. यासाठी आता पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्याकरिता ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी विशेष शाखेकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, गुन्हे शाखेची पथकेही बंदोबस्तात राहणार आहेत.