Adtiya L1 Solar Mission : चंद्रयान-3 नंतर भारताने आणखीन एक पाऊल पुढे टाकत, 2 सप्टेंबरला ISRO चं आदित्य L1 अवकाशात झेपावलं आणि इस्रोनं देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. दरम्यान, आदित्य L1 (Aditya L1) बाबत इस्रोकडून सातत्यानं अपडेट्स शेअर करण्यात येत आहेत. त्याच्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इस्रो आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत असतं.
या ट्वीटमध्ये आदित्य एल1 नं काढलेला सेल्फी ट्वीट केला आहे. आदित्य एल1 सूर्याच्या दिशेने म्हणजेच, एल 1 पॉईंटकडे आपला प्रवास करत आहे. दरम्यान, सूर्य, पृथ्वी एल 1 पॉईंटसाठी जाणाऱ्या आदित्य-एल1 नं पृथ्वी आणि चंद्राचे सेल्फी आणि काही फोटो काढले आहेत.
इस्रोनं दुसऱ्यांदा आदित्य L-1 ची कक्षा वाढवली आहे. आता आदित्य L-1 पृथ्वीपासून 40 हजार 225 किलोमीटवर पोहोचलंय. 10 सप्टेंबरला तिसरा थ्रस्टर फायर करून आदित्य L-1 च्या कक्षेत तिसऱ्यांदा वाढ केली जाणार आहे. इस्रोचं आदित्य L-1 दोन सप्टेंबर रोजी सूर्याकडे झेपावलं. त्यानंतर 24 तासांतच आदित्य L-1 ची कक्षा पहिल्यांदा वाढवण्यात आली. त्यानंतर आज पहाटे पावणेतीन वाजता आदित्य L-1 ची कक्षा वाढण्यात आली आहे. आदित्य L-1 एकूण 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार असून पाचवेळी थ्रस्टर फायर करून कक्षा वाढवणार आहे.
2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C57 च्या XL आवृत्ती रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. प्रक्षेपणाच्या 63 मिनिटं 19 सेकंदांनंतर, अंतराळयान पृथ्वीच्या 235 किमी x 19500 किमीच्या कक्षेत ठेवण्यात आले.