मुंबई : (Adv. Rapali Patil Thombare On Sheetal Mhatre) शुक्रवार दि. 23 रोजी मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. हा राष्ट्रवादीचा खोडसाळपणा असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. मात्र, आपण चुकून त्या खुर्चीवर बसल्याची कबुली श्रीकांत शिंदेंनी दिली आहे.
मात्र, यावेळी शिंदे गटाच्या मदतीला माजी नगरसेवका शीतल म्हात्रे धावून आल्या. दरम्यान, त्यांनी सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा कथित फोटो सोशल मीडियावर शेअर केला. “कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय, बघा तुम्हीच”. असं कॅप्शन देऊन सुप्रिया सुळे यांचा तो फोटो शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला.
त्यानंतर तो फोटो मॉर्फ असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने फोटोमागचं सत्य सांगून शीतल म्हात्रेंना आरसा दाखवला आहे. शीतल म्हात्रेंच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. ट्विट डिलीट करा नाहीतर कारवाई करु, असा इशाराच राष्ट्रवादीने शीतल म्हात्रेंना दिला आहे.
यावर पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शीतल म्हात्रेंवर बोचरी टीका केलीये. “म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय?”, असा सवाल त्यांनी फेसबुक पोस्ट करुन विचारला आहे.