तब्बल 16 वर्षांनंतर शाहरूखसोबतच्या वादाबाबत सनी देओलनं सोडलं मौन; म्हणाला, “ते सर्व बालिश होतं…”

मुंबई | Sunny Deol – अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपटाला मोठं यश मिळालं. त्यानंतर आता अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या दोघांच्या चित्रपटांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. पण बहुतेक लोकांना शाहरूख आणि सनी देओलच्या वादाबाबत माहिती नसेल. ‘डर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांशी अबोला धरला होता. तर आता तब्बल 16 वर्षांनंतर सनी आणि शाहरूखचं भांडण मिटलं असून याबाबत सनीनं भाष्य केलं आहे.

‘गदर 2’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये शाहरूख आणि सनी देओलनं एकमेकांना मिठी मारली होती. त्यामुळे त्या दोघांमधील भांडण मिटल्याचं दिसलं. तर सनीनं नुकतीच ‘आप की अदालत’मध्ये मुलाखत दिली. यावेळी त्यानं शाहरूखसोबतच्या भांडणाबाबत भाष्य केलं.

या भांडणाबाबत बोलताना सनीनं सांगितलं की, एक वेळ अशी येते की तेव्हा तुम्ही मागचं घडलेलं सगळं विसरता. तसंच ते घडायला पाहिजे नव्हतं असं तुम्हाला जाणवतं. ते भांडण खूपच बालिश होतं. त्या वादानंतर मी आणि शाहरूख बऱ्याचदा भेटलो आहे. आम्ही आमच्या चित्रपटांबद्दल बोलायचो. तसंच शाहरूखनं त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत मिळून माझा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यानं मला फोन देखील केला होता. त्यामुळे आता आमच्यात सगळं काही ठीक आहे.

शाहरूख आणि सनीमध्ये नेमका वाद काय होता?

‘डर’ या चित्रपटात शाहरूख खाननं राहुल मेहराची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सनी देओल त्याच्या भूमिकेविषयी खुश नव्हता. सनीनं या चित्रपटात कमांडो ऑफिसरची भूमिका साकारली होती. त्यामुळे शाहरूखनं साकारलेल्या राहुल मेहराच्या भूमिकेला अधिक महत्त्व दिल्याचं सनीला वाटत होतं. त्यामुळे सनी इतका चिडला होता की त्यानं स्वत:ची पँट फाडली होती आणि ही गोष्ट त्याच्या लक्षातही आली नव्हती. त्यानंतर शाहरूख आणि सनीनं एकमेकांशी बोलणं बंद केलं होतं.

Sumitra nalawade: