पुणे : पुणे महापालिकेच्या राजकारणावर २० वर्षे पकड ठेवलेले माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी १० वर्षांच्या खंडानंतर महापालिकेत पाऊल ठेवले.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना यंदाच्या पुणे फेस्टिव्हलचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने महोत्सवाचे संयोजक म्हणून सुरेश कलमाडी महापालिका भवनात आले होते. ७८ वर्षीय कलमाडी काठी टेकत, पण त्यांच्या नेहमीच्या उत्साहात आले होते. त्यांनी राखाडी रंगाची पँट आणि गुलाबी रंगाचा टीशर्ट घातला होता.
पांढऱ्याशुभ्र दाढीतले कलमाडी यांना ओळखायला लोकांना थोडा वेळच लागला. पण, जेव्हा ओळख पटली तेव्हा महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये त्यांना पाहाण्यासाठी कमालीची उत्सुकता वाढली. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कलमाडी म्हणाले, यापुढेही मी पालिका भवनात येत राहीन. त्यांच्या या सूचक वाक्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसला कलमाडी सक्रिय झाले तर हवेच आहेत. महापालिका भवनातील कलमाडी यांच्या आयुक्त भेटीच्या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी उपमहापौर आबा बागुल आणि डॉ. सतीश देसाई, रमेश अय्यर, माजी नगरसेवक अविनाश बागवे, पुणे फेस्टिव्हलचे कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या राजकारणात १९९२ साली सुरेश कलमाडी यांनी पकड घेतली आणि त्यानंतर सातत्याने २० वर्षे म्हणजे २०१२ सालपर्यंत शहराच्या राजकारणावरची त्यांची पकड कायम राहीली होती. २०१२साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कथित घोटाळा प्रकरणात कलमाडींवर आरोप ठेवण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले. गेली १० वर्षे सुरेश कलमाडी पुण्याच्या सार्वजनिक जीवनात फारसे दिसले नाहीत. क्वचित कुठल्यातरी समारंभात दिसायचे. यंदा पुणे फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून त्याच्या तयारीत गेले दोन महिने बैठका, भेटीगाठी यात कलमाडी भाग घेत आहेत. सार्वजनिक जीवनात ते सक्रिय झाल्याने त्यांच्या भोवती गर्दी जमा होत आहे.