सांगली | मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगलीच्या कुपवाड नजीक अनधिकृत मशीद (Kupwad Masjid) बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे त्या वादग्रस्त जागेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. आज सकाळपासूनच घटनास्थळी पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. साधारण महिन्याभरापूर्वी याठिकाणी मशीद बांधकामाच्या वादातून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात गटाकडून परस्पर तक्रार केली होती. आता या वादग्रस्त जागेची पालिकेकडून मोजणी करण्यात येत आहे. या जागेवर दावा करणारे दाेन्ही गट देखील कागदपत्रांसह उपस्थित राहिले आहेत.
सांगलीच्या कुपवाड रोडवरील सूतगिरणी नजीक मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी एका मशिदीच्या बांधकामावरून 26 फेब्रुवारी रोजी दोन गटांमध्ये मारामारीचे प्रकार घडला होता. सदरच्या ठिकाणी महापालिकेचे शाळेचे आरक्षण असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशांनी या ठिकाणी या मशिदीला विरोध केला होता. सदर ठिकाणी महापालिकेच्या शाळेचं आरक्षण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बहुसंख्य हिंदू समाज असून ज्या ठिकाणी मशीद बांधण्यात येत आहे, तेथे गणपती मंदिर आहे, त्यामुळे येथे मशीद नको, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे.
सध्या या परिसरात असणाऱ्या वादग्रस्त मशीदच्या जागेत पत्र्याचे मोठे कंपाउंड मारण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या जागेला कुलूप देखील लावण्यात आले आहे. तसेच आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. सदर मशिद बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने घटनास्थळी दाखल झाले आहे. पालिकेच्या नगर रचना पथकाकडून याठिकाणी जागेचे मोजमाप करण्यात आले.