मुंबई : ( Anand Didhe Family Reaction on Ekanath Shinde) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळं महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर हजर असणारे आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत, असं केदार दिघे यांनी सांगितलं.
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले, गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळं नाही तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळं वाढली आहे. त्यामुळं एखादा नेता गेला तरी, सेनेला काही फरक पडत नाही. यापुर्वी शिवसेनेला अनेक धक्के मिळाले आहेत, तरी सेना भक्कम ऊभी आहे. कारण आमच्याकडं बाळासाहेबांचे, दिघेसाहेबांचे विचार आणि तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने काम करेल असं केदार दिघे म्हणाले.
ते म्हणाले, मीडियामध्ये शिंदे यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा आहे. भाजपाकडे जाऊन उपमुख्यमंत्रीद घ्यावं अशी त्यांची मागणी आहे. ही बातमी खरी असेल तर, दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये असे केदार दिघे म्हणाले.