“या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे, त्यामुळे…”, योगेश कदम यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

मुंबई | MLA Yogesh Kadam Accident – शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. या अपघातात योगेश कदम बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला आहे. या दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

योगेश कदम म्हणाले की, “माझ्या गाडीचा काल रात्री अपघात झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेनं मी या अपघातातून सुखरूप बचावलो. माझ्या गाडीच्या मागे माझी एस्कॉर्ट गाडी होती आणि पुढे रायगड पोलिसांची गाडी होती. तरी देखील मागून एक डंपर वेगानं आला आणि पोलिसांच्या गाडीला धडकला. त्यानंतर माझ्या गाडीलासुद्धा जोरदार धडक बसली आणि अपघात झाला. पण मी सीटबेल्ट घातला होता. त्यामुळे मला कोणतीही दुखापत झाली नाही.”

“हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक फरार झाला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. त्यामुळे यामध्ये घातपाताची शक्यता आहे. मी पोलिसांना या अपघाताबाबत तपास करण्यासाठी सांगितलं आहे. तसंच, मी या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. आम्हाला जी शंका आली आहे, त्यादृष्टीनं तपास करुन सत्य जर पुढे आलं, तर चांगलंच आहे. भविष्यात त्या दृष्टीनं काळजी घेता येईल”, असंही योगेश कदम म्हणाले.

Sumitra nalawade: