दुबई : संयुक्त अरब अमिराती (युएई) चे अध्यक्ष शेख खलिफा यांचे काल निधन झाले. त्यानंतर युएई चे नवीन अध्यक्ष कोण असतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. त्या नावाची घोषणा आता करण्यात आलेली आहे. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्यानंतर आता यूएईचे अध्यक्षपद प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे देण्यात आलं आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे तिसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत.
शेख खलिफा यांचे काल वयाचा ७३व्या वर्षी निधन झाले. शेख खलिफा बिन झायेद अल नाहायान हे 3 नोव्हेंबर 2004 पासून युएईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारत होते. त्याआधी 1971 ते नोव्हेंबर 2004 पर्यंत त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान देशाचे प्रमुख होते. शेख खलिफा हे UAE चे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. त्यांनी UAE आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावून अनेक सुधारणा केल्या आहेत. जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.