मुंबई | Rohit Sharma – आता आयपीएल 2023 (IPL 2023) चा सीझन शेवटच्या टप्प्यांवर येऊन पोहोचला आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सनं विजय मिळवत प्ले ऑफचे तिकिट बुक केले. तर काल (21 मे) मुंबई इंडियन्सनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत शानदार विजय मिळवला. तसंच गुजरात टायटन्सनं राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान, आरसीबीच्या पराभवानंतर आता रोहित शर्माचं (Rohit Sharma) एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.
गुजरात टायटन्स विरूद्ध आरसीबी सामना सुरू होण्यापूर्वी राहित शर्मानं डु प्लेसिसच्या संघाकडे एका पूर्वीच्या उपकाराची आठवण करून दिली होती. तसंच आम्हाला अशीच एक संधी द्या अशी मागणी केली होती. मुंबई इंडियन्सनं आरसीबीला 2022 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरवण्यास मदत केली होती.
“तुमचं ज्या गोष्टींवर नियंत्रण आहे तेच तुम्ही नियंत्रित करू शकता. त्यानंतर तुम्ही सर्वोत्तम परिणामांची आशा करू शकता. मी कोणासोबतही बोललो नाही. आम्ही जर आम्हाला जे हवंय ते साध्य केलं नाही तर त्यासाठी आम्ही स्वत:लाच दोषी ठरवू. जर आम्ही प्लेऑफला पोहोचलो तर सर्व श्रेय मी माझ्या संघाला देईन. गेल्या वर्षी आरसीबीवर आम्ही उपकार केले होते. त्यामुळे मला आशा आहे की ते सुद्धा उपकारांची परतफेड करतील”, असं रोहित शर्मा म्हणाला होता. सध्या त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.