पुणे | Chhagan Bhujbal – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ हे दोन दिवसाच्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर या प्रकरणी पुणे पोलिसांनी प्रशांन पाटील या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तसंच या प्रकरणावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं असून त्यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
या धमकी प्रकरणी छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “माझ्या एका सहाकाऱ्यानं मला धमकी आल्याचं सांगितलं. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मग पोलिसांनी काही तासांतच आरोपीला महाडमधून ताब्यात घेतलं. पण आता मी कार्यकर्त्यांना एकच सांगतो की, शरद पवार आणि त्यांचं कुटुंबीय अशी धमकी देण्याचं काम करणार नाहीत. अशी कामं अतिउत्साही लोक करतात.”
दरम्यान, माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर प्रशांत पाटील या आरोपी व्यक्तीला मोबाईलच्या आधारे महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली. तसंच आरोपी प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा असून त्यानं मद्यधुंद अवस्थेत छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.