अडीच हजार दहीहंड्यांचा थरार
रत्नागिरी : दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर यावर्षी दहीहंडी, गणेशोत्सव आणि सर्वच सण उत्साहात साजरे करता येणार आहेत. मात्र यंदा रत्नागिरी जिल्ह्यातदेखील दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये २३३९ खासगी दहीहंडी, तर २५१ सार्वजनिक दहीहंडी उभारली जाणार आहेत, तर ८ ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गोविंदा आला रे आला… गोविंदा रे गोपाळा या गीतांवर थिरकत जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. दहीहंडी सर्वत्र जलोषात साजरी करण्यात येणार आहे. या उत्सवात तरुणांचा जल्लोष असतो. दोन दिवसांवर आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथके सज्ज झाली असून काही पथकांनी सरावालादेखील सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्ह्यातील पथकांसह जिल्ह्याबाहेरची पथकेही येतात.
रत्नागिरी शहरात ६ सार्वजनिक दहीहंड्या
जिल्ह्यातील रत्नागिरी शहरात यंदा ६ सार्वजनिक दहीहंड्या असणार आहेत. सर्वाधिक हंड्या या जयगड, दापोली, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी शहर सार्वजनिक ६, खासगी ७०, तर ग्रामीणमध्ये सार्वजनिक ५५, खासगी ६६ दहीहंड्या असणार आहेत. तसेच पूर्ण जिल्ह्यात २५१ सार्वजनिक, तर २३३९ या खासगी दहीहंड्या असणार आहेत.
सध्या दहीहंड्यांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या किमतीतही स्पर्धा असल्याने सध्या दहीहंडीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. गतवर्षी महाराष्ट्र सरकारने सन २०१२ मध्ये जाहीर केलेल्या क्रीडा धोरणात गोविंदांच्या साहसी क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जवाबदारी गोविंदा पथकांवरच राहणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर यांच्यासह इतर सर्व उपाययोजनांची व्यवस्था गोविंदा पथकांनाच करावी लागणार आहे.