रायपुर | बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांना त्यांची पत्नी रोज काठीने मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबांनी केले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह इतर पक्षांनीही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
वारकरी संप्रदायाकडून तीव्र संताप
भाजपच्या (BJP) अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले (Tuhar Bhosale) यांनी बागेश्वर बाबांचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर धाम यांनी जगतगुरु तुकारामांबद्दल बोलताना चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यातून संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यातून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर बाबांनी तुकारामांची माफी मागावी, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली.
बागेश्वर बाबांचं वक्तव्य काय आहे?
“संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय….”