अग्निपथ… अग्निपथ…!

बाह्य संरक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि देशाला विकसित करणे हा मोदी सरकारचा नियोजित आराखडा असावा. अर्थात मोदी सरकारने हे करून दाखवावे. म्हणजे हे सरकार अभिनंदनास तर पात्र होईलच आणि विरोधकांची तोंडेही बंद होतील. मार्ग सोपा नाही. परिश्रम केले पाहिजेत. घाम गाळला पाहिजे. रक्ताचे पाणी केले पाहिजे, तरच हा अग्निपथ पार पाडता येईल आणि विकासाच्या वाटा अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचेल.

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेत लष्कराच्या तिन्ही दलांसाठी अग्निपथ अंतर्गत जवानांना नियुक्त करायचे आहे. तरुण होतकरू आणि धाडसी युवकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. अर्थात या उमेदवारांना चार वर्षांच्या कंत्राटी भरतीवर नियुक्त केले जाणार आहे. संरक्षण संदर्भातील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा निवडणुकीचा स्टंट असल्याचा आरोपही केला. अग्निपथ भरती योजना ही क्रांतिकारी योजना आणि भारत सरकारने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

देशप्रेम, देशभक्ती याबरोबर अर्थार्जन हे दोन्ही हेतू साध्य होणार आहेत. युवकांना त्यांच्या जाणीव येण्याच्या वयात देशभक्तीचे धडेही या काळात मिळतील. लष्करात भरती झाल्यामुळे शिस्तसुद्धा येईल आणि त्याचा उपयोग त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच होईल. केवळ रोजगार हा विषय यामागे नसून देशाची एक सशक्त व समृद्ध आणि वैचारिकदृष्ठ्या सक्षम पिढी निर्माण करणे हा यामागचा हेतू असू शकतो. महागाई वाढत आहे आणि त्यावर तातडीने थेट उपाययोजना करणे शक्य नाही. घरोघरी बेकारांच्या टोळ्या निर्माण झाल्या तर अंतर्गत सुरक्षेलाही धोका असतो. या सगळ्याचा विचार करून अग्निपथसारखा उपक्रम देशाच्या विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरणार आहे. या अग्निपथावर वाटचाल करणारा युवक कोणत्याही संकटांना आव्हान देण्यासाठी सज्ज होईल. परकीय आक्रमण झाले तर असंतुष्ट असलेल्या देशांतर्गत मंडळींना राज्य उलथवून टाकण्यासाठी ही मोठी संधी असते. ही संधी देशातील असंतुष्ट व्यक्तींना मिळू नये यासाठीच ही एक उपाययोजना असू शकते.

अग्निपथ या योजनेचा विचार केला तर युवकांसाठी आयुष्य बदलणारी म्हणजेच परिवर्तनशील योजना आहे. यात शिस्त, स्वयंप्रेरणा आणि धाडस या तीनही गुणांना वाव मिळणार आहे. देश बलवान करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. एकीकडे युवकांच्या वैचारिकतेमध्ये परिवर्तन करीत असताना संरक्षण दलामध्येही आमूलाग्र बदल करणे हे अग्निपथ योजनेचे उद्दिष्ट आहे. संरक्षण दलामध्ये ही तरुणाई दाखल झाल्यामुळे तरुणांची ताकद आणि वरिष्ठांचा अनुभव या दोन्हींचे उत्तम समायोजन होऊ शकेल. तसेच होणार्‍या भरतीमधील काहीजणांना चार वर्षांऐवजी पूर्ण कालखंडाची सेवासंधीही दिली जाणार आहे. थोडक्यात चार वर्षांनंतर या सेवेमध्ये राहायचे असेल तर स्वतःला शाबित करणे आणि तनमनाने देशाची उत्तम सेवा करणे हे अनिवार्य असेल. देश केवळ यंत्र-तंत्र या साहाय्याने सुसज्ज ठेवत असताना या यंत्र-तंत्रामागचा विचार मेंदूही तेवढाच तल्लख ठेवणे यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत विचारविनिमय आणि नियोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांमध्ये अनेक लहानसहान बाबींचा विचार यात केला आहे. भारत सरकारचे हे एक अभिनंदनीय पाऊल आहे. लष्करातील भरतीबरोबर केंद्र सरकारकडून दीड वर्षात दहा लाख नोकर्‍या निर्माण करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत. याबाबत निर्णयांची अंमलबजावणी युद्धपातळीवर करावी, असेही निर्देश मोदी यांनी दिले आहेत. बेकारी वाढत आहे, त्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्ष कायम टीका करीत आहे. साहजिकच २०२४ मधील निवडणुकांमध्ये सरकार बेरोजगारांना नोकरी देऊ शकत नाही, असा प्रचाराचा मुद्दा होऊ नये, यासाठी आगामी दीड वर्षात नोकरभरती करण्याची मोहीम आखली जात आहे. एका अहवालानुसार केंद्र सरकारच्या सर्व नागरी कर्मचार्‍यांची संख्या ३१ मार्च २०२० पर्यंत ३१ लाख ९१ हजार होती, तर मंजूर झालेल्या पदांची संख्या ४० लाख ७८ हजार इतकी होती.

थोडक्यात काम करणारे जे कर्मचारी होते, त्यांच्यापेक्षा जास्त संख्या कर्मचारी भरतीसाठीच्या मंजूर पदांची होती. अशा परिस्थितीत कर्मचारी का भरले जात नव्हते हे एक गौडबंगाल आहे. एकीकडे लष्कर आणि दुसरीकडे नागरी विभागात प्रशासकीय कामकाजात युवकांना आणणे याचा अर्थ देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून तरुण करणे होय. विरोधकांनी यासंदर्भातही टीकेची झोड उठवली आहे. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या घोषणेसारखी ही घोषणापण केवळ आश्वासन आहे. यातून काही साध्य होणार नाही, तर निवडणुकीसाठी युवकांना आकृष्ट करण्याचा हा एक भाग आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. देश महागाई, बेरोजगारी अशा समस्यांशी झुंजत असताना अंतर्गत व बाह्य संरक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि देशाला विकसित करणे हा मोदी सरकारचा नियोजित आराखडा असावा. अर्थात मोदी सरकारने हे करून दाखवावे, म्हणजे हे सरकार अभिनंदनास तर पात्र होईलच, मात्र विरोधकांची तोंडेही बंद होतील. मार्ग सोपा नाही. परिश्रम केले पाहिजेत. घाम गाळला पाहिजे. रक्ताचे पाणी केले पाहिजे तरच हा अग्निपथ पार पाडता येईल आणि विकासाच्या वाटा अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचेल.

Sumitra nalawade: