सतीश ब. कुलकर्णी
मी यज्ञकर्माला धार्मिक विधी न समजता तंत्रज्ञान असे संबोधत असतो. यज्ञसंस्थेचा अंगिकार प्राचीन भारतीय ऋषी-मुनींनी केवळ एक धार्मिक कार्य म्हणून केला नाही तर यज्ञाद्वारे आरोग्य, कृषी, पर्यावरण या सामाजिक महत्त्वाच्या जबाबदार्या पार पाडता येतात, हे त्यांच्या लक्षात आले होते. म्हणूनच यज्ञाला धार्मिक विधी न समजता सामाजिक स्वास्थ्याचे तंत्रज्ञान समजले जावे, असा माझा आग्रह असतो. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकारांची केवळ तोंडओळख आपण गेल्या लेखात केली. प्रत्येक यज्ञ हा काही विशिष्ट हेतूनेच केला जातो. त्यामध्ये ‘सर्वे भवन्तु सुखीन:, सर्वे सन्तु निरामय:’ ही भावना तर असतेच. पण ते ध्येय साध्य कसे करायचे याचे मार्गदर्शनही असते. अश्वमेध, राजसूय असे यज्ञ खूप खर्चिक आणि दीर्घकाळ चालणारे असतात. केवळ राज्यकर्तेच ही जबाबदारी पेलू शकत. पण सोमयागासारखे यज्ञ हे समाजाचा एखादा छोटा वर्गही सामूहिक रीतीने करू शकतो आणि अग्निहोत्रासारखा यज्ञ तर आपण आपल्याच घरात रोज सकाळ, संध्याकाळ करू शकतो. या अग्निहोत्राचे खरे वैज्ञानिक स्वरूप आज आपण माहीत करून घेणार आहोत.
अग्निहोत्र हा श्रौत नित्यकर्म यज्ञ आहे. याचा अर्थ तो श्रुतींमध्ये म्हणजे वेदोक्त आहे. हा करण्यासाठी जात, वर्ण यांचे काही बंधन नाही. इतकेच नव्हे तर अगदी परधर्मीयसुद्धा अग्निहोत्र स्वतः करू शकतो. नित्यकर्म म्हणजे रोज करायचा यज्ञविधी. प्रथम आपण हा रोज कसा करायचा असतो हे पाहू. यासाठी आवश्यक असणार्या गोष्टी अशा…
१. तुमच्या घरावर (अक्षांश आणि रेखांश) होणार्या सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची अगदी नेमकी (सेकंदात) वेळ.
२. एक विशिष्ट आकाराचे तांब्याचे पात्र.
३. गोमयाचे थापलेले कोरडे बिस्किटाच्या आकाराचे ५/७ तुकडे (गोवर्या).
४. दोन्हीकडे टोके असणारे (अक्षता म्हणजे क्षत न झालेले, न तुटलेले) तांदळाचे दोन चिमूटभर दाणे.
५. गाईचे एक छोटा चमचाभर साजूक तूप.
सकाळी सूर्योदयाच्या वेळेआधी १० मिनिटे, पूर्वेकडे तोंड करून मांडी घालून बसावे. अग्निहोत्र पात्रामध्ये गोवर्यांचे तुकडे व्यवस्थित लावून घ्यावे. त्यांच्यावर थोडे तूप टाकावे. एका छोट्या वाटीमध्ये तुपात भिजवलेले तांदळाचे दाणे ठेवावे. गोवर्या प्रज्वलित कराव्यात. साधारणपणे अक्षतांची आहुती देण्याच्या वेळी अग्नीची ज्वाला ४/५ इंच वर जाणारी असली पाहिजे. जवळ स्टॉपवॉच ठेवावे. आपल्या घरावरील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या सेकंदाइतक्या बरोबर वेळेसाठी, agnihotra.org या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपल्या घराचा पत्ता लिहावा. १/२ दिवसांत तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या दरदिवसाच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या सेकंदात बरोबर असणारे वेळापत्रक मिळते. याप्रमाणे सूर्योदयाच्या क्षणी दोन मंत्रांचा मोठ्याने उच्चार करून भिजविलेल्या तांदळाच्या दोन आहुती द्यायच्या असतात.
१. सूर्याय स्वाहा:। सूर्याय, इदं न मम॥
२. प्रजापतये स्वाहा:। प्रजापतये, इदं न मम॥
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हीच पद्धत, फक्त वरील क्र.१ चा मंत्र वेगळा आहे, तो असा…
अग्नये स्वाहा:। अग्नये, इदं न मम॥
आहुती दिल्यानंतर आपल्याला शक्य आहे तितका वेळ तिथेच डोळे मिटून स्वस्थ बसावे. रोजचा विधी संपन्न झाला.
आता या सर्व क्रियांच्या वैज्ञानिक परीक्षणांविषयी. २०१२ साली झालेल्या वैदिक विज्ञान दिनाच्या परिसंवाद कार्यक्रमानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील बायोटेक्नॉलॉजी विभागातील काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अग्निहोत्राचे वैज्ञानिक परीक्षण करायचे ठरवले. सुरुवातीचा एक महिना या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतच दिवसाच्या दोन्ही वेळेला जे काही सांगितले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करून प्रयोग केले आणि त्यांच्या नोंदी केल्या. प्रयोगशाळेतील उपकरणे वापरून त्यांनी प्रयोगशाळेतील वातावरणातील बॅक्टेरिया, इकॉलॉय आणि इतर जीवजंतूंवर काय परिणाम झाला, ते पाहिले. तसेच वातावरणातील CO२, NOX, SO४, CO आदी वायूंच्या प्रमाणात काय फरक पडला, त्यांच्या नोंदी घेतल्या. प्रयोगशाळेत काही कुंडीतील झाडांची रोपे आणून ठेवली होती. त्यांच्यावर काय परिणाम होतोय, हे पाहिले. तसेच प्रयोगानंतर उरलेल्या रक्षेचे तुपात क्रीम करून त्याचा त्वचारोगावर उपचार करून पाहिला. अशा तर्हेने एक महिना प्रयोग केल्यानंतर पुढच्या काही महिन्यांत दिलेल्या घटकांपैकी (पॅरामीटर्स) केवळ एक बदलून आणि बाकीचे घटक न बदलता प्रयोग केले. म्हणजे केवळ पात्राचा आकार बदलला आणि प्रयोग केले.
नंतर आकार मुळात तोच ठेवून तांब्याऐवजी स्टीलचे पात्र घेतले आणि प्रयोग केले. नंतर गायीच्या तुपाऐवजी म्हशीचे तूप वापरले. नंतर गोमयाऐवजी म्हशीच्या शेणाच्या गोवर्या वापरल्या. नंतर तुटलेल्या तांदळाचे दाणे वापरले. नंतर बाकी सर्व सामग्री तशीच ठेवून फक्त वेळेमध्ये फरक केला आणि सरतेशेवटी बाकी सर्व गोष्टी तशाच ठेवून मंत्र न म्हणता प्रयोग केले. हे सर्व प्रयोग सुमारे सहा ते आठ महिने चालले. या सर्व प्रयोगांचे निष्कर्ष थोडक्यात सांगायचे तर अग्निहोत्रानंतर लगेचच हवेतील घातक विषाणूंमध्ये लक्षणीय घट झाली. तसेच विषारी वायूंच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली. प्रयोगशाळेच्या बाहेर दूर अंतरावर असणार्या रोपांपेक्षा प्रयोगशाळेतील रोपांची वाढ लक्षणीय झाली आणि अग्निहोत्राच्या रक्षेपासून तयार केलेल्या क्रीमच्या वापराने त्वचारोग पूर्ण बरा झाला. आणखी काही निरीक्षणे अशी– अग्निहोत्राच्या यशासाठी आवश्यक असणार्या अनेक घटकांपैकी क्रमाक्रमाने एकेक बदलून केलेल्या प्रयोगातून असे आढळून आले की, बदललेल्या घटकामुळे अग्निहोत्राच्या एकूण परिणामांमध्ये ५ ते ८ टक्के नकारात्मक फरक पडतो. अगदी बाकी सर्व घटक तेच ठेवून आहुती देत असताना केवळ मंत्रोच्चार न केल्याने केलेल्या प्रयोगांमध्ये सतत ३ टक्के इतका नकारात्मक फरक पडला. याचा अर्थ असा की, अग्निहोत्राच्या पूर्ण यशासाठी सगळे घटक जसे सांगितले आहेत तसेच वापरायला हवेत. विद्यार्थ्यांच्या या ग्रुपने त्यावर्षी पुणे महानगरपालिकेने महाविद्यालयीन मुलांसाठी आयोजित केलेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक सादर करून पहिले बक्षीस मिळविले. अग्निहोत्राच्या या यशाने उत्साहित झालेल्या प्रणय अभंग नावाच्या विद्यार्थ्याने याच विषयावर लक्ष केंद्रित केले आणि अनेक वेगवेगळे प्रयोग यशस्वी करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून दोन वर्षांपूर्वी पीएच.डी.ही मिळविली. त्याने असे दाखवून दिले की, अग्निहोत्राची रक्षा पाण्यात मिसळून झाडांवर आणि मुळांपाशी टाकल्यावर २८ प्रकारच्या विषारी रासायनिक द्रव्यांचा पूर्ण नाश करता येतो. याच शोधासाठी त्याला दोन आंतरराष्ट्रीय पेटंट्सही नुकतीच मिळाली आहेत. इतर ठिकाणी झालेल्या आणखी काही प्रयोगांमुळे आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. एक, अग्निहोत्र रक्षा दूषित पाण्यात मिसळल्यास ४० ते ६० मिनिटांमध्ये पाणी आंतरराष्ट्रीय प्रमाणांप्रमाणे पिण्यास योग्य होते. दोन, सभोवतालच्या वातावरणातील प्रदूषण लक्षणीय स्वरूपात कमी होते. पिकांवरील अनेक प्रकारची कीड नष्ट होते. झाडांची वाढ तुलनात्मक लवकर आणि जास्त होते. लागणारी फळे अधिक चांगली आणि मोठी असतात.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अक्कलकोट येथील गजानन महाराज (परांजपे) यांनी अग्निहोत्राचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक देशांना भेटी देऊन तिथल्या लोकांना अग्निहोत्राचे महत्त्व समजावून सांगितले. तेथील विज्ञानवादी लोकांना त्याचे आकर्षण निर्माण झाले आणि आज परिणामतः जवळपास ७२ देशांमध्ये ‘अग्निहोत्र सोसायटीज’ निर्माण झाल्या आहेत आणि हजारो लोक नियमितपणे रोज अग्निहोत्र करीत असतात. agnihotra.org या संकेतस्थळावर आपल्याला जगभरातील या चळवळीविषयी अद्यावत माहिती मिळू शकते. पाश्चात्त्य देशांमध्ये अग्निहोत्र रक्षेपासून तयार केलेली अनेक त्वचेवर वापरता येण्याजोगी क्रीम्स मिळतात. दक्षिण अमेरिका खंडातील अनेक शहरांमधल्या इस्पितळात डॉक्टर आणि पेशंट मिळून इस्पितळ जंतूरहित करण्यासाठी अग्निहोत्र करतात. रोज अग्निहोत्र केल्यामुळे आपल्याला असलेल्या व्याधीतून कशी सुटका झाली, याची पुराव्यासहित अनेक उदाहरणे या संकेतस्थळावर आपण पाहू शकतो.
कोविडची महामारी ऐन भरात होती, त्यावेळी पुण्यातील एच.व्ही.देसाई महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आणि प्रसिद्ध बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील अग्निहोत्राचे सगळे प्रयोग करण्यात आले त्या डॉ. गिरीश पाठाडे सरांनी कोविडचे कल्चर मिळविण्यासाठी आणि निदान काही इस्पितळाच्या आवारात अग्निहोत्र करू देण्यासाठीही विनंती केली होती. पण सरकारने दोन्ही विनंत्यांना केराची टोपली दाखवली.
शेवटी, अग्निहोत्र काय किंवा इतर कोणत्याही प्रकारचा यज्ञ काय, ही अंधश्रद्धा तर नाहीच नाही, पण पुरोहितांनी केलेली लूटमारही नाही. ते एक उच्च प्रतीचे विज्ञान आहे. यज्ञांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी आपल्याला सामाजिक स्वास्थ्याचा एक अनमोल नजराणा देऊन ठेवला आहे. आपण केवळ अट्टहासाने या अनमोल नजराण्याकडे पाठ फिरवून बसलो आहोत.