करडी नजर, हातात सिगारेट…; अजय देवगनच्या ‘मैदान’चं पोस्टर आऊट

Ajay Devgn Maidaan Poster Out : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘भोला’ (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान त्याने त्याच्या आगामी ‘मैदान’ (Maidaan) या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे.

अजय देवगनने शेअर केलेल्या ‘मैदान’च्या पोस्टरमध्ये अजय सिगारेट ओढत काहीतरी विचार करताना दिसत आहे. तसेच या पोस्टरवर एक माणूस, एक विश्वास आणि एक आत्मा असं लिहिलेलं दिसत आहे. पोस्टर रिलीज झाल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पोस्टर शेअर करत अजयने लिहिलं आहे,”एक माणूस…एक विश्वास आणि एक आत्मा… सत्य घटनेवर आधारित कथानक… संपूर्ण भारत मैदानात उतरेल… 30 मार्चला टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला”.

अजय देवगनचा बहुचर्चित ‘भोला’ हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘भोला’ या सिनेमासोबत अजय ‘मैदान’ या सिनेमाचा टीझरदेखील रिलीज करण्यात येणार आहे. एकंदरीतच डबल धमाका करण्यासाठी अजय सज्ज आहे.

अजय देवगनने सोशल मीडियावर ‘मैदान’ या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने सिनेमाची रिलीज डेटदेखील शेअर केली आहे. हा सिनेमा 23 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2022 मध्ये अजयने ‘दृश्यम 2’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे आता त्याचे आगामी सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपल्या जादू दाखवण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘मैदान’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रविंद्रनाथ शर्माने सांभाळली आहे. या सिनेमात अजयसह गजराव राव आणि प्रियामणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर या सिनेमाला ए आर रहमानचं संगीत लाभलं आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Prakash Harale: