गाडीत महाराजांची मूर्ती असल्याने तिरुपतीच्या दर्शनापासून अडवल्याच्या प्रकारावर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रातील एक मराठी माणूस तिरुमला तिरुपतीला दर्शनासाठी गेला असता त्याला दर्शनासाठी जाण्यापासून अडवण्यात आले. अडवण्यामागचं कारण म्हणजे त्याच्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. महाराजांची मूर्ती काढून ठेवा मग पुढे जा अशा सूचना संस्थानाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. त्याचवेळी मराठी माणसाने त्याला दर्शनाला जाण्यापासून अडवण्यात येत असल्याचं सांगत एक व्हिडीओ बनवून सोशल मीडिया वर शेअर केला. तो व्हिडीओ बघून मराठी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

तो व्हिडीओ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला असून त्यांनी नेमके काय प्रकरण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळात आहेत. व्हिडीओ बघितल्यानांतर मी त्यांच्याशी बोललो आहे.” महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित अशा चर्चा होणे चुकीचे असून त्याबद्दल संस्थानाकडून जाहीर निवेदन पाठवण्याची विनंती देखील अजित पवारांनी केली आहे.

दरम्यान, तिरुमला संस्थांकडून आपली बाजू मांडण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देवस्थानच्या नियमांनुसार येथे येताना कोणत्याही प्रकारची मूर्ती, झेंडा, छायाचित्र, पूजेचे साहित्य घेऊन येण्यास मनाई आहे. त्यानुसार त्यांनी संबंधित व्यक्तीला अडवलं. मात्र, त्याने महाराजांचा अपमान केला जात असल्याचं म्हणत व्हिडीओ तयार केला. असं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

Dnyaneshwar: