पुणे : (Ajit Pawar appeal to ShivSainiks against) चिंचवड आणि कसबा पोट निवडणुकीचा प्रचारानं सध्या चांगलाच वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, चिंचवडमधील एका सभेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिवसैनिकांना एक मोठं आवाहनं केलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार कारणाऱ्यांचा बदला घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
अजित पवार म्हणाले, “आपल्याला उद्याची कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक का महत्वाची आहे. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकारचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि पायउतार व्हावं लागलं, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे”
आता इजा-बिजा झाली आता यांना तिजा दाखवायची आहे, त्याशिवाय गप्प बसायचं नाही. मित्रांनो काय चुकलं, शिवसेना काढली कुणी हे तुम्हाला माहितीच आहे. जे गेले त्यांचा शिवसेना काढण्यात खारीचा किंवा नखाचा तरी वाटा आहे का? काही संबंध आहे का? शिवसेनाप्रमुखांनी तिकीट दिलं म्हणून निवडून आणलं यांना, असंही यावेळी पवार म्हणाले.
बाळासाहेबांनी शिवाजी पार्कमध्ये सांगितलं होतं की, आता माझं वय झालेलं आहे. यापुढं शिवसेना प्रमुखाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळतील. तसेच युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील. मग जर बाळासाहेबांनी हे सांगितलं असताना हे सटर फटरवाले काय मधीच करायला लागलेत. उद्या निवडणुका लागू द्या यांची काय अवस्था होतेय ते बघाच, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.