मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त काल शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “एकेकाळी तुम्ही शऱद पवारांची मुलाखत घेता आणि तोंडभरुन कौतुक करता. असा काय चमत्कार घडला? त्यावेळी मुलाखत घेताना शरद पवार यांना जातीयवादी वाटले नाहीत आणि काही दिवसातच जातीयवादी वाटू लागले. शरद पवार आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत का? शरद पवार १९६२ पासून युवक काँग्रेसमध्ये काम करत आहेत. त्यावेळी या लोकांचे जन्मही झाले नव्हते. अशा लोकांनी शरद पवारांवर टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकल्यासारखं आहे. राज ठाकरेंकडून ही अपेक्षा नव्हती”. राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलत असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले.