पुणे | Ajit Pawar – काल (7 एप्रिल) विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाॅट रिचेबल असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या होत्या. अजित पवार नाॅट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तसंच ते नेमके गेले कुठे? असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. अशातच पवारांनी आज (8 एप्रिल) माध्यमांसमोर येत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना ते नाॅट रिचेबल का होते याबाबत स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. पवार म्हणाले की, “काल मला काम करत असताना अचानक पित्ताचा त्रास होऊ लागला. दौरे आणि जागरण जास्त झालं की मला पित्ताचा त्रास होतो. हा त्रास मला खूप वर्षांपासून आहे. त्यामुळे मी काल डाॅक्टरांकडे गेलो औषधं घेतली आणि झोपलो. आज बरं वाटायला लागल्यानंचर मी परत सकाळपासून कार्यक्रम सुरू केले आहेत. पण या दरम्यान माध्यमं कसल्याही बातम्या दाखवत होते. मला त्या बातम्या पाहून वाईट वाटलं.
काल मी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. तुम्ही हे सगळं बंद करा ना, आधी खरं काय आहे ते तपासा, ती व्यक्ती कुठे आहे ते तपासा. एखाद्याची कारण नसताना बदनामी करायची, पण किती बदनामी करायची याला एक मर्यादा असते. आम्ही पब्लिक फिगर असल्यानं तुम्हाला आमच्या बातम्या देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बातम्या देणं बरोबर नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले.