अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “असल्या फालतू…”

पुणे | Ajit Pawar On Abdul Sattar – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. तसंच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काल (29 सप्टेंबर) बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“आमच्या नेत्याला आम्ही बोललो की शिवसेना वाचवायची तर तुम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल. महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनासाॅर आहे”, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली होती. तसंच त्यांची ही टीका अजित पवारांवर असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आज (30 सप्टेंबर) पुण्यात प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना विचारल असता त्यावर त्यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही. आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. त्याला महत्त्व न देता, त्या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. बेरोजगारी वाढली, वेदान्तसारखा प्रकल्प गेला. दोन लाख तरूणांचा रोजगार गेला. त्याविषयी त्यांनी बोलावं. इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असं माझं सत्ताधाऱ्यांना आवाहन आहे”, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, सरस्वती देवीच्या फोटोविषयी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलेल्या विधानाविषयी विचारणा करताच अजित पवारांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भुजबळांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. हे पक्षानं सांगितलं आहे. प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ती पक्षाची भूमिका नाही”, असं अजित पवार म्हणाले.

Sumitra nalawade: