बारामती | Ajit Pawar On Devendra Fadnavis – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. मात्र, अखेर काल (24 सप्टेंबर) पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं. ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. ते बारामतीत बारामती सहकारी बँकेच्या 61 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
“शनिवारी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिले आहेत. तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ येत होतं. आठवड्यातून किमान एक दिवस मला जिल्ह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत, ते त्यांना कसं पेलवणार आहे, हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा, असंही अजित पवार म्हणाले.