मुंबई | Ajit Pawar On Devendra Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 9 मार्च रोजी 2023-24 चा अर्थसंकल्प (Budget 2023-24) मांडला. त्यानंतर या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षानेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसंच या अर्थसंकल्पाला आज (13 मार्च) विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोध दर्शवला आहे.
अजित पवार म्हणाले की, “संत तुकाराम महाराजांच्या शब्दांत अर्थसंकल्पाचं वर्णन करायचं असेल तर, ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, जेवूनिया तृप्त कोणी झाला,’ असं आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे पूर्ण न होणाऱ्या घोषणांचा पाऊस आहे. यामधून कोणालाही दिलासा मिळणार नाही, असं माझं मत आहे. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी आणि योजना पुढं गेल्या पाहिजेत, याची काळजी अर्थमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती. गेल्या वर्षी ‘पंचसुत्री’च्या आधारावर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ‘पंचामृत’ असं नाव दिलं. कुठेही गेले की थोडेसं ‘पंचामृत’ देतात. ते झाल्यावर प्रसाद देतात.”
“म्हणजेच आम्हा सर्वांना ‘पंचामृत’ दिलं. नंतर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाला प्रसाद दिला. प्रसादानंतर जेवण असतं, ते भाजपवाल्यांना (BJP) पोटभरून दिलं. भाजपवाल्यांना महाप्रसाद, एकनाथ शिंदेंना प्रसाद आणि आम्हाला थोडं, थोडं पंचामृत दिलं,” असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, “फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करता आला असता. पण, येथे असं का झालं माहिती नाही. कोणतीही अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आर्थिक धोरणात स्पष्टता आणि सातत्य लागतं. तुमच्या आर्थिक धोरणाकडं संपूर्ण जगाचं लक्ष असतं”, असंही अजित पवार म्हणाले.