नागपूर | Ajit Pawar – आजपासून (19 डिसेंबर) बेळगावात कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसंच कर्नाटकात कलम 144 देखील लागू करण्यात आलं असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोणीही एकमेकांच्या राज्यात जाण्यास अडवणूक करायची नाही, असं ठरलं होतं. मात्र, लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येऊ नये म्हणून सांगितलं आहे.”
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर सांगायचं समंजस्याची भूमिका घेऊ. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागणार आहे. मात्र, मराठी लोकांची बेळगावात धरपकडं सुरु करायची. तिथले मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, “गृहमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. पण, गृहमंत्र्यासमोर ठरलेलं कोण मोडत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. यावर काय कारवाई केली जाणार, हे देखील समजलं पाहिजे,” असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.