मुंबई | Ajit Pawar – आज (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
“शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसंच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खडेबोल सुनावले आहेत.
“वाचाळविरांना आवरा हे सातत्यानं सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धाच लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपण कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचं तारतम्य या लोकांना राहिलेलं नाहीये,” अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांना सुनावलं आहे.