अंतर्गत दुफळी शमविण्याचा प्रयत्‍न

अजित पवार स्‍वतःच देताहेत लक्ष…

पिंपरी : राज्‍यात सत्तांतर झाल्‍यानंतर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बॅकफूटला गेलेला दिसत होता. स्‍थानिक पातळीवर कार्यक्रम आयोजित होत होते. परंतु, ज्‍या गटाचा कार्यक्रम त्‍याच गटाच्‍या पदाधिकाऱ्यांची उपस्‍थिती दिसायची. एवढेच नव्‍हे तर आमदार अण्णा बनसोडे यांची अनुपस्‍थिती देखील सातत्‍याने जाणवत होती.

येत्‍या काही महिन्‍यांमध्ये महापालिकेच्‍या निवडणुका होणार आहे. सद्यस्‍थिती लक्षात घेत आता राज्‍याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी स्‍वतः शहरातील पक्ष बांधणीत आणि राजकारणात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. एका अर्थाने आता सूत्रे थेट अजित पवारांच्‍या हाती जाताना दिसत आहेत. असे झाल्‍यास भाजपासाठी आगामी निवडणूक खूप मोठे आव्‍हान ठरणार आहे.
बहुमताच्‍या जवळपासही नसताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्‍यात सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली होती. यामुळे शहर पातळीवर देखील पक्षाला चांगलेच बळ आले होते. त्‍यानंतर पक्षाने स्‍थानिक कार्यकारिणीमध्ये बदल घडवून आणत आक्रमकता आणखी वाढली.

परंतु, सत्ता असेपर्यंतच सक्रिय राहण्याचे सूत्र जणू काही राष्ट्रवादीच्‍या शहरातील कार्यकर्ते आणि काही पदाधिकाऱ्यांनी अंगिकारले होते. शहरात केवळ पाच वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्‍या या पक्षातील नेत्‍यांचे बळ सत्ता जाताच निघून जाते, हे पुन्‍हा एकदा स्‍पष्ट झाले. राज्‍यात सत्ता येताच हुरुप आलेल्‍या नेत्‍यांना सत्ता बदल होताच मरगळ आली. पक्षात इतर पक्षातून होणारी इनकमिंग पूर्णपणे ठप्‍प झाली. भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आलेले नेते सुरुवातीला खूपच आक्रमक होते. परंतु, राज्‍यात सत्ता बदल होताच काही अपवाद वगळता पक्ष बदलून आलेले सर्व नेते खूपच शांत झाले. दुसरीकडे पक्षातही दुफळी पडल्‍याचे दिसून येत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्‍या उपस्‍थितीत होत असलेल्‍या पक्षाच्‍या कार्यक्रमाला देखील अनेकांनी दांडी मारली होती. पदाधिकाऱ्यांची अनुपस्‍थिती एवढी लक्षणीय होती की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगावे लागले की, अनुपस्‍थित असलेल्‍या पदाधिकाऱ्यांची यादी पाठवा. त्‍या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी अनुपस्‍थित पदाधिकाऱ्यांनी चांगलेच सुनावले होते. परंतु, पुढे काही कारवाई झाली नाही.

त्यानंतर पक्षाला ओहोटी लागण्याची चिन्‍हे दिसू लागली. अनेक जण भाजपच्‍या वाटेवर असल्‍याच्‍या अफवा उठू लागल्‍या. हे पाहता स्‍वतः अजित पवार यांनीच पक्ष बांधणीत लक्ष घातले आहे. अजित पवार यांनी थेट शहरातील सोसायटीधारकांशी संवाद साधत त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्या. केवळ समस्‍या जाणून अजित पवार थांबले नाहीत, तर त्‍यांनी आयुक्‍तांची भेट घेत या समस्‍या सोडविण्यासाठी प्रयत्‍न सुरू केले. अजित पवार यांच्‍या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्‍या आमदारांसह अनेक पदाधिकारी उपस्‍थित होते.

सोसायट्यांचे प्रश्न घेऊन स्‍वतः अजित पवारांना बसावे लागत आहे. हे पाहता स्‍वकीय आणि विरोधकांना देखील प्रश्न पडला आहे की, स्‍थानिक पातळीवर पक्ष कमी पडतो आहे की अजित पवार यांनीच महापालिकेची निवडणूक खूप गंभीरतेने घेतली आहे. पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना एकजुट करुन जनसमस्‍यांना हात घालण्याचा पवित्रा अजित पवार यांनी स्‍वीकारला असल्‍याने आता पक्षाच्‍या कार्यक्रमांची गर्दी होताना दिसत आहे.

Sumitra nalawade: