पुणे | Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (17 ऑक्टोबर) पुण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात भाष्य केलं. पुण्यात पावसानं मोठा धुमाकूळ घातला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात परतीच्या पावसानं हाहाकार माजवला असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव तर मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि लातूर या 10 जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाच, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला, तसंच या पावसाचा परिणाम रब्बीच्या पिकांवरही झाला आहे. त्यामुळे आताच्या महाराष्ट्र सरकारनं मागे जाहीर केलं होतं की, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार, मात्र अजूनही ते झालेले नाही.
काल ते महाराष्ट्रातील विविध भागात पाहणी दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतकरी म्हणाले, आम्हाला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसून कोणाला विचारायला गेले तर कोणीही याची दखल घेत नाही. तसंच यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाल्याचं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत त्वरित लक्ष देऊन राज्य सरकारनं त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. अशी आमची मागणी आहे, असंही अजित पवार म्हणाले.