मुंबई : (Ajit Pawar On Sanjay Raut) राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा माध्यमांमध्ये पेरल्या जात आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकच्या माध्यमातून याबद्दल भाष्य करण्यात आलं होतं.
तर आज माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अजित पवार भाजपमध्ये आले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सुनावलं आहे. पण दादांचा रोष नेमका कोणाकडे? संजय राऊत की, संजय शिरसाठ असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
अजित पवार म्हणाले, “आम्ही सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, पक्षातच राहणार आहोत, याला कोणताही आधार नाही. इतर राजकीय पक्षाचे लोक याबद्दल स्वतःची मतं व्यक्त करत आहेत. त्यांनी खुशाल करावीत, त्यांना तो हक्क आहे. आज मी माझ्या कार्यालयात बसतो, त्यावेळी आमदारांच्या मीटिंग असतात. मंत्रालयात आलेले आमदार मला भेटायला आले, त्याचा वेगळा अर्थ काढू नका.
काही बाहेरच्या पक्षाचे लोक आमच्या पक्षाचं प्रवक्तेपद घ्यायला लागले आहेत. मी आता बैठकीत बोलणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण तुम्ही आमच्याबद्दल बोलू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. तुम्ही आमचं वकीलपत्र घेऊ नका. त्यांनी त्यांची त्यांची भूमिका मांडावी. आमची भूमिका मांडायला आमच्या पक्षाचे नेते, प्रवक्ते मजबूत आहेत.