मुंबई : (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government) रामनवमीच्या मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. जाळपोळीच्या या राड्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मात्र, सामान्य नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपींसह सुमारे ४०० ते ५०० अज्ञातांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आहेत. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. माझं संभाजीनगरमधील नागरिकांना सांगणं आहे, की कोणी जर तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असले, तर त्याला थारा देऊ नका, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
तसंच 2 एप्रिल रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबरोबरच सभेदरम्यान संभाजीनगरमधील वातावरण बिघडले, असं विधान कोणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.