मुंबई | OBC Reservation – आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वड्डेटीवार तसंच अन्य नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली. शरद पवार यांनीही त्या काळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिले याचा मनापासून आनंद आहे.
ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम सुरूवातीपासून आम्ही केलं. हीच भूमिका यापुढेही कायम राहिल. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.