बारामती | Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तारांवरही (Abdul Sattar) निशाणा साधला. काहीजण आता गरळ ओकत आहेत. अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल गरळ ओकली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी राज्यपाल चुकीचं बोलले. तर अफजलखानानं शिवाजी महाराजांचा कोथळा काढला असं गोपीचंद पडळकर म्हणतात. अरे गोपीचंदा काय बोलतो, आमदारकीला शोभेल असं वागलं पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी टीकास्त्र सोडलं. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरही टीका केली. आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात चांगलं काम केलं आहे. पण काहींनी गद्दारी केली. त्यानंतर आमचं सरकार गेलं. आता काही वाचाळवीर बोलू लागले आहेत. काहीजण गरळ ओकत आहेत. कोणाही सत्तेचा माज करु नये. मागे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) बोलले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तावडीतून सुटले. सुटले कसे एकनाथ शिंदे पळाले. आधी सुरत मग गुवाहाटी, मग परत रेडा अस ऐकलं त्यानंतर जोतिषाला हात दाखवल्याचा खोचक टोला पवारांनी लगावला.
पुढे ते म्हणाले, आपण शिक्षणाला देणगी दिली म्हणतो. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणतात भीक मागितली. तुम्ही काय बोलता? तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. त्यामुळं आमची का बदनामी करता? असा सवालही अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना विचारला आहे.