मुंबई | Ajit Pawar – सध्या राज्य विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. आजपासून (8 मार्च) अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाचं कामकाज बंद होतं. तसंच आज विरोधक आणि सत्ताधारी विविध मुद्यावरुन आमने-सामने येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा (Rain) फटका शेती पिकांना बसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या (International Womens Day) महिलांना शुभेच्छा देत राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले की “आज एका गोष्टीची खंत वाटते की एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रीमंडळात एकही महिला नसणं हे थोडसं कमीपणाचं वाटतं. हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही.”
तसंच गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. यामध्ये महिला मंत्र्यांना स्थान मिळावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. यावरही अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. “मी अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलाय. सभागृहातही मी बोललो आहे. पण नेमकी काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हाला आणि महिला वर्गालाही योग्य वाटत नाही”, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे अजित पवारांनी अवकाळी पावसाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचं सांगितलं. “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 6 ते 9 मार्च असा हवामान बदलाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे अजून पुढील दोन दिवस नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, अशी मागणीही करणार आहोत”, असंही अजित पवारांनी सांगितलं.