बारामती | Ajit Pawar – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे सर्वांना परिचित आहेत. पण ते कधी कोणत्या गोष्टीला घाबरायचे असं जर कुणी सांगितलं तर त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र यासंदर्भातला एक किस्सा अजित पवार यांनी सांगितला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या जीवनातला एक किस्सा सांगितला आहे.
यावेळी अजित पवारांनी एक आठवण उपस्थितांना सांगितली. “मला आठवतंय बारामतीतली बरीच मुलं नीरा डाव्या कॅनलमध्ये किंवा विहिरीत पोहायला शिकली आहेत. आपल्याकडे कॅनॉलचा 33 फाटा आहे. त्या फाट्यात आम्ही पोहायचो. उन तापायला लागलं की पुन्हा बाहेर यायचो आणि मातीत झोपायचो. राजूदादा तीच आठवण काढत होता की ‘कशी रे अजित तेव्हा मजा यायची’. आता काय मजा येते ते बघू”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी यावेळी केली.
“माझं तर सांगूच नका. मी तर पाण्याला एवढा घाबरायचो आणि लांबनंच सगळ्यांची मजा बघत बसायचो. माझ्या मागे डबा बांधून ते वरनंच द्यायचे फेकून. त्या डब्याचा दोर तुटला वैगेरे तर जागेवरच खाली. पण आमच्या वरिष्ठांना काही वाटायचं नाही. तेव्हापासून आमचे वरीष्ठ आमच्याशी असे वागायचे. तुम्हीच बघा आता काय ते! तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय यासाठी तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे बाबांनो. काय सांगायचं आता तुम्हाला”, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
पुढे अजित पवार म्हणाले, “श्रीनिवास त्या दिवशी पोहायला शिकला आणि मला संध्याकाळी म्हटला दादा मी पोहायला शिकलो. रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी गेलो आणि पोहायलाच शिकलो. म्हटलं धाकटा भाऊ पोहायला शिकला आणि आपण न शिकता कसं चालेल. ते फार वेगळे दिवस होते.”