अजित पवारांच्या नावे नवा विक्रम; सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

अजित पवारांच्या नावे नवा विक्रम

आज राज्यात सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आझाद मैदानात आज महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा पार पडला. देशभरातील दिग्गज या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांच्या नावे नवा विक्रम स्थापित झाला आहे. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी विविध खाती सांभाळली आहेत. त्यांनी राज्य, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. अजित पवारांनी पहिल्यांदा १९९१ साली लोकसभा लढवली. पहिल्याच निवडणूकीत ते बारामतीतून थेट लोकसभेत निवडून गेले.  तीन चार महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर 1991 सालीच ते बारामतीतून आमदार म्हणून उभे राहिले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायऱ्या चढले. त्यानंतर गेली 33 वर्षाहून अधिक काळ ते आमदार आहेत. 

चार मुख्यमंत्री अन् एक उपमुख्यमंत्री

अजित पवारांनी १० नोव्हेंबर २०१० मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पृथ्वीराज चव्हाण हे तेव्हा मुख्यमंत्री होते. २५ सप्टेंबर २०१२ पर्यंत ते तेव्हा उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर, २५ ऑक्टोबर २०१२ ते २६ सप्टेंबर २०१४ तेव्हाही पृथ्वीराज चव्हाण यांच्या पदाखाली त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या काळात ते औटघटेकेचे उपमुख्यमंत्री बनले हते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी या पदाची शपथ घेतली. परंतु, हे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळले. हे सरकार कोसळल्यानंतर लागलीच ३० नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ पर्यंत ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

जून २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला. त्यानंतर २ जुलै २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.

काही तासांचे उपमुख्यमंत्री

2019च्या निवडणुकांनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार 80 तासांत कोसळलं होतं. 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019 या काळात उपमुख्यमंत्री होते. मात्र हे सरकार कोसळल्यानंतर 30 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत ते ठाकरे सरकारच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री होते. 

Rashtra Sanchar: