नागपूर | Ajit Pawar – काल (27 डिसेंबर) महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमाप्रश्नाचा ठराव एकमतानं मंजूर झाला आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद कर्नाटक विधिमंडळात उमटले आहेत. यावेळी कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी. एन. अश्वथ्य नारायण (C N Ashwath Narayan) यांनी महाराष्ट्राला डिवचलं आहे. सीमाप्रश्नावरून सी. एन. अश्वथ्य नारायण यांनी मुंबईत 20 टक्के कानडी नागरिक असल्याचा जावईशोध लावत मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. ते आज (28 डिसेंबर) नागपूर हिवाळी अधिवेशनात बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “आपण कालच (27 डिसेंबर) कर्नाटक सरकारचा निषेध करणारा आणि सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचा ठराव एकमतानं मंजूर केला. सातत्यानं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आणि नेते महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचवण्याचं काम करत आहेत. दुर्दैवाने त्यांना जशास तसं उत्तर दिलं जात नाही, म्हणून त्या लोकांची जीभ चेपली गेलीय.”
“मुंबई केंद्रशासित प्रदेश करावी अशी मागणी कर्नाटक सरकारचे कायदामंत्री माधूस्वामी यांनी त्यांच्या विधिमंडळात केली. तसंच मुंबईत 20 टक्के कन्नड भाषिक राहतात असा जावईशोधही लावला. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे”, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात कन्नड माणसं नाहीत का? महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. सर्वांना आपण एकोप्याने घेतो. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नाला अशाप्रकारे चुकीचं वळण देण्याचं आणि सीमावासीयांच्या भावना दुखावण्याचं काम करत आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, त्यांनी या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध करावा. कर्नाटक सरकार वारंवार असं वक्तव्य करत आहे. कर्नाटक असं वारंवार करत आहे हे केंद्र सरकारपर्यंत पोहचवावं. कारण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेऊन काही गोष्टी ठरवल्या होत्या,” असंही अजित पवारांनी सांगितलं.