मुंबई | Prithviraj Chavan – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्सवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. तसंच अजित पवार हे उपमुख्यंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) हटवून त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशा चर्चाही सातत्यानं सुरू आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “जर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजप एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार नाही. कारण एकनाथ शिंदेंचा प्रभाव हा ठाण्याबाहेर जास्त नाहीये. तर आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय उरला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल.”
“तसंच एकनाथ शिंदेंबाबत 10 ऑगस्ट दरम्यान एक निर्णय येईल. कदाचित त्याआधीही हा निर्णय येऊ शकतो आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील”, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.