पुणे | Ajit Pawar – आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्याच्या (Pune) टिंबर मार्केटला भेट दिली. या मार्केटमध्ये आग लागली होती, त्यामुळे तिथं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं. त्याची पाहणी आज अजित पवारांनी केली. यावेळी व्यापाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान, अजित दादांनी राज्यातील आगामी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी अजित पवारांनी पुण्यातील कसबापेठ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता बोलून दाखवली. “एक बातमी मला समजली आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहीलंय, त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही असं मला वाटत होतं. पण कदाचित गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे”, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
दरम्यान, आज अजित दादा रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी पुण्यात आले असताना राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात माध्यमांनी अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले, “कोणती आणि कसली राष्ट्रवादीची बैठक, कोण सांगतं तुम्हाला? तुम्हाला मिळालेली ही माहिती खोटी आहे. अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाहीये”, असं अजित पवारांनी सांगितलं.