अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची खंत
पुणे : अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाकडे सात हजारांहून अधिक चित्रपट निर्माते आहेत, मात्र त्यातील पाचशेसुद्धा कार्यरत नाहीत. पुण्यातील १० सुद्धा सक्रिय नाहीत; तसेच नाट्य निर्मिती संस्थासुद्धा ५५ हून अधिक आहेत. मात्र पाचसुद्धा सक्रिय नाहीत हे वास्तव आहे. बालगंधर्वच्या वर्धापनदिनानिमित्त चार दिवस सर्वजण उत्साही असतात, मात्र त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती असते. असे का, याचा विचार करण्याची गरज आहे. निर्मितीमूल्यांमध्ये, प्रसिद्धीमध्ये नेमके कुठे कमी पडत आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले.
आपले निर्माते नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेत उतरल्यानंतर सेटपासून काटकसर करायला सुरुवात करतात. ५-१० प्रयोग करूया हे आपल्याच डोक्यात येते, कलाकारांची निवड त्यांचे प्रश्न या सर्व प्रक्रियेत एकसंधपणा दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निर्मात्याला प्रत्येक प्रयोगाला येणे शक्य नसते यामुळे इतर सर्वांनी जबाबदारी, शिस्तीने वागले पाहिजे, शिस्त कलेसाठी असते. सर्वांनी आपलं म्हणून काम केलं पाहिजे. पुण्यात मोठे प्रयोग शक्य आहेत. नवीन कलावंतांना संधी दिल्या पाहिजेत.
— मेघराज राजेभोसले, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष
पुण्यात स्वर सर्वेश प्रॉडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नाटक दिग्दर्शक विनोद खेडकर यांच्या ‘जानम समझा करो’ आणि नृत्य दिग्दर्शक अर्जुन जाधव यांच्या बहारदार नृत्य संगीताचा कार्यक्रम ‘वाजतंय ते गाजतंय’ या कार्यक्रमाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला. यावेळी मेघराज राजेभोसले बोलत होते.
याप्रसंगी दोन्ही कार्यक्रमांचे निर्माते संतोष चव्हाण, अभिनेते माधव अभ्यंकर, ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश देशमुख, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, अभिनेता चेतन चावडा, हेमंत एदलाबादकर, मिलिंद शिंत्रे, योगेश जाधव, सागर पाठक, प्रशांत तपस्वी, विवेक वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
निर्माते संतोष चव्हाण म्हणाले, मराठी नाटक ‘जानम समझा करो’ आणि बहारदार नृत्य संगीताचा कार्यक्रम ‘वाजतंय ते गाजतंय’ हे दोन वेगळ्या धाटणीचे कार्यक्रम एकाचवेळी रंगमंचावर आणत आहोत. दोन्ही कलाकृतींमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. त्याला रसिकांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. २३ ऑगस्ट रोजी दु. १२.३० वा. जानम समझा करो’, तर सायं. ५:३० वा. ‘वाजतंय ते गाजतंय’ पहिला प्रयोग रामकृष्ण मोरे नाट्यगृह पिंपरी येथे होणार आहे.