ब्राह्मणाचा एल्गार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ जाऊन महासंघाकडून मंत्रघोष करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील तेथे पोहोचल्या. यावेळी त्या बुके आणि केळी घेऊन दाखल झाल्या, मात्र यानंतर ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते तेथून निघून गेले.

अमोल मिटकरी यांनी काढलेल्या उद्गारांचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. ब्राह्मण समुदाय रस्त्यावर उतरला आणि मिटकरी, जयंत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. ‘शरद पवार हाय हाय’चा नाराही अनेक ठिकाणी लावला गेला. पुणे जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, पंढरपूर येथेही ब्राह्मण समाजाने निदर्शने केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना येथील ब्राह्मण समाजाने घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्ती केली. मिटकरी यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी समाजात तेढ वाढवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे काही पदाधिकार्‍यांनी बोलून दाखवले.

जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात, मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असे वक्तव्य होणे योग्य नव्हते. माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झाले, असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मिटकरी यांनी मात्र आपण माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काही ठिकाणी निवेदनेही सादर केली गेली. दरम्यान, पुण्यात रुपाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही धक्काबुक्की केली नाही. मी आंदोलन करण्यासाठी आले, तेव्हा त्यांच्या महिला पदाधिकारी आमच्या रोहन नावाच्या पदाधिकार्‍याच्या अंगावर गेल्या. तुमचे आंदोलन लोकशाही पद्धतीने परिसराच्या बाहेर करा असे आम्ही सांगत होतो. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी बुके आणला होता. तसेच उपवास असल्याने केळी घेऊन आले होते. पण ते केळी न घेताच निघून गेले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी लोकशाही पद्दतीने आंदोलन करावे. आमच्या ऑफिसमध्ये घुसून मंत्रोच्चार करण्यासाठी तुमची गरज नाही. अमोल मेटकरी यांनी दुखावणारे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. फक्त टिप्पणी केली आहे.

अमोल मिटकरींना सध्या मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांपुढे अशी वक्तव्ये केली तर ते हीरो बनतात. त्यांनी या आधी सुद्धा इतर समाजाबद्दल अशी वक्तव्ये केली आहेत. मंत्रिपद मिळविण्यासाठी एका विशिष्ट समाजाला टार्गेट केले जाते. असे केल्याने आपल्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल या आशेने अशी बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यांनी आजपर्यंत स्वतःचे काही कर्तृत्व सिद्ध केले नाही. त्यांना मागच्या दारातून विधान परिषदेचे सदस्य बनवले गेले आहे. सध्या जशी युक्रेनची अवस्था झाली आहे, तशी राष्ट्रवादी काँग्रेसची होत असल्याचे दिसत आहे. नुसत्या नकला करून मंत्रिपद मिळवता येत नाही. तर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे लागत आहे. नेत्यांनी नेहमीच बोलताना अथवा वक्तव्य करताना आपण काहीतरी चुकीचे तरी बोलत नाही ना? की ज्या बोलण्याने एखादा समाज दुखावला जाईल, याकडे खरेच गांभीर्याने पाहिले पाहिजे. तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी वकिली बोलणे योग्य नव्हेच. अमोल मिटकरींनी जरी समाजाची माफी मागितली, तरी त्याचा आता उपयोग होणार नाही. कारण ब्राह्मण समाज सध्या त्यांच्या वक्तव्यावरून खूप संतापला आहे. या गोष्टींचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. तरी नेत्यांनी बोलताना तारतम्य राखावे.
_जितेंद्र कुलकर्णी, उद्योजक

अमोल मिटकरी जे बोलले आहे ते पूर्वापार हिंदू संस्कृतीबद्दल बोलले आहेत. हिंदू संस्कृती मोडण्याची वृत्ती गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून चालू आहे. कारण कोणत्याही देशाचा पाया अथवा कणा मोडायचा तर संस्कृतीवर घाला घालावा लागतो आणि जे काही संस्कृतीवर असे बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. अशी वक्तव्ये करणे म्हणजे पूर्णपणे बेजबाबदार आहेत. व्यासपीठावर असलेले पक्षाचे नेतेसुद्धा या वक्तव्याला छद्मी हसले ही लाजीरवाणी गोष्ट आहे. जर एखाद्याला प्रसिद्धी पाहिजे असेल तर समाजाला नावे ठेवा म्हणजे तुम्हाला आपोआप प्रसिद्धी मिळेल. या हेतूने सध्या बकबक सुरू आहे. या घटनेचा मी पूर्णपणे निषेधच करतो.
_विजय शेकदार, प्रदेश चिटणीस, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

काय म्हणाले होते अमोल मेटकरी?
इस्लामपूर येथील सभेत बोलताना मेटकरींनी एक किस्सा सांगितला होता. एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होते. मी म्हटले अन्नदान ऐकले, नेत्रदान ऐकले, रक्तदान ऐकले. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितले ‘अरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा.. कधी सुधरणार’, असे मिटकरी म्हणाले होते.

दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगत मेटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मेटकरी यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.कन्या हा काही दान करण्याचा विषय नाही. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचे नाव घेतलेले नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचे काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचे काम विरोधकांकडून होते आहे. असे मिटकरी म्हणाले आहेत.

राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा…
मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याचे मी उत्तर मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची, राजा शिवछत्रपतींची जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे, असे मेटकरी म्हणाले.

गाढव शृंगारिले कोडे। काही केल्या नव्हे घोडे…

  • नेटिजन्स भडकले

गाढव शृंगारिले कोडे।
काही केल्या नव्हे घोडे।
त्याचे भुंकणे न राहे।
स्वभावाशी करील काय।

संत तुकाराम महाराजांच्या या शब्दकठोर वचनांचा दाखला देत सध्या अमोल मिटकरी यांच्यावर नेटिजन्सकडून प्रचंड टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण आणि हिंदू समाजावर टीका करण्याच्या ओघात विवाह पद्धतीमधील पुरोहितांच्या भूमिकेबद्दल गलिच्छ शब्दात टीका केली, त्यावरून सोशल मीडिया वरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अनेक नेटिझन्सनी समाज माध्यमावर हिंदू समाजातील विवाह पद्धतीचे पावित्र, त्यातील मंत्रोपचार आणि विधी याबाबत भावना व्यक्त करत अमोल मेटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे. या भाषणात बोलण्याच्या ओघात जातीय द्वेषाची पराकोटी व्हावी अशा पद्धतीने मेटकरी यांनी ब्राह्मण समाजावर तोंडसुख घेतल्याचे दिसते आहे. ते म्हणाले की, लग्नामध्ये भटजी/पुरोहित नवोदित वधू-वरांचा हात हातामध्ये घेतात. पुरोहित सांगतो की, बायकोचा हात माझ्या हातात दे आणि ’मम भार्‍या समर्पयामि’ असे म्हण. म्हणजे माझी बायको तू घेऊन जा.. असे तो सांगतो. आपला बहुजन समाज कधी शहाणा होणार? ’अशा पद्धतीचे अवमानकारक उद्गार मेटकरी यांनी काढले होते.

विशेष म्हणजे व्यासपीठावर असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी कुत्सितपणे हसून त्यांना दाद दिली. आचमन, हनुमान चालीसा, संस्कृत ऋचा यावरून देखील मेटकरी यांनी वक्तव्य केल. हे सर्व मंत्र, परंपरा यातून बहुजन समाजाला फसवले जात आहे. असा त्यांचा एकूण सूर होता. या वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला देखील जातीवादी पक्ष म्हणून पुन्हा अधोरेखित केले जात आहे अशी भावना देखील अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या संकुचित विचारसरणीवर भाष्य करत टीकेची झोड उठवली जात आहे.

Dnyaneshwar: