स्वच्छता मोहीम राबवणारे ‘अखिल चैतन्यनगर मित्र मंडळ’

लवकरच आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पा येणार असं जरी म्हटलं तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बागडू लागतात. अनेक गणेश मंडळे बाप्पाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात करीत असतात. प्रत्येक गावात, शहरात, परिसरात, सोसायटीमध्ये एकतरी गणेश मंडळ असतेच. ही मंडळे सामाजिक बांधीलकी जपत विविध उपक्रम राबवत असतात. असेच पुण्यातील धनकवडी भागातील अखिल चैतन्यनगर मित्र गणेश मंडळ’ हे अशाच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असतात.

‘आरोग्य हीच संपत्ती’ हे कोरोना काळाने खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे. त्यावेळी शहराच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ लागला. त्यातून एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली, ती म्हणजे कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर सामाजिक विलगीकरण जितके आवश्यक आहे तितकेच व्यक्तिगत स्वच्छता राखणेही महत्त्वाचे आहे. जिथे जिथे स्वच्छतेचे निकष पाळले जातील आणि परिसरातही स्वच्छता असेल तिथे कोरोनाचा फैलाव कमी होईल यासाठी या मंडळाने स्वच्छता मोहीम हा उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.

यामध्ये त्या परिसरातील रस्त्यावर पडलेला कचरा, सांडपाणी या ठिकाणची स्वच्छता सर्वांनी मिळून करून अनेक आजारांपासून कसे दूर राहता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच मंडळाने झोपडपट्टी भागातील गोरगरीब नागरिकांना धान्यवाटप करून कोणी उपाशी राहिला नको या हेतूने हा उपक्रम राबविला. तसेच दिवाळीचा फराळ देण्यात येतो.

त्यांच्या जीवनात दिव्याच्या जोतीचे तेज यावे, त्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. आपण सर्वांनी गेल्या दोन वर्षामध्ये रक्ताचा तुटवडा झालेला बघितला आहे. अचानक आलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये रक्त, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकजणांनी आपले प्राण गमावले आहेत. याचबरोबर रक्तदान शिबिर असेल किंवा मुलांना पुस्तके देऊन त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचं कामदेखील हे मंडळ करीत असते. अशा माध्यमातून ज्या ज्या नागरिकांना मदत करणे शक्य होईल ते सर्व हे मंडळ करीत असते. असे हे उपक्रमशील गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता मोहीम राबवत आहे.

Dnyaneshwar: