“‘या’ माणसावर तर पहिले कारवाई करणार”; ठाकरे-शिंदेंनी घोषणा केलेल्या ऐतिहासिक चित्रपटावर संभाजीराजे भडकले

पुणे : नुकतंच महेश मांजरेकर निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत बॉलीवूड स्टार अक्षय कुमार दिसणार आहे. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावरून संताप व्यक्त केला आहे. महाराजांच्या इतिहासाची मोडतोड कदापी सहन करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या चित्रपटात सिनेमॅटिक फ्रिडमचा अतिरेक करत महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. महाराजांचा इतिहास जगभर पोहोचलाच पाहिजे. कोणीही महाराजांवर ऐतिहासिक चित्रपट तयार करत असेल तर आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्याला अशावेळी जी मदत होईल ती आपण त्या चित्रपट निर्मात्याला देऊ. मात्र, महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजेंनी यावेळी दिली. त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डाने एक ऐतिहासिक समिती स्थापन करायला पाहिजे अशी मागणीही संभाजी राजेंनी यावेळी केली आहे.

या चित्रपटात राज ठाकरेंचा आवाज देखील घेण्यात आलेला आहे. मुळात चित्रपटाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असलेला अक्षय कुमार सुद्धा उपस्थित होता. मला शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळतेय ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं अक्षय कुमार यावेळी म्हणाला होता.

मात्र, याच कार्यक्रमात चित्रपटात सात वीर मावळ्यांची भूमिका साकारणारे कलाकार देखील उपस्थित होते. मात्र, त्यांच्या कोणाच्याही डोक्यावर पगडी नाहीये. संपूर्ण चित्रपटात देखील त्यांच्या डोक्यावर पगडी नसल्याचं दिसत आहे. यावरूनच संभाजीराजे चिडले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मराठ्यांत पगडी काढणे याचा अर्थ वेगळा होतो. चित्रपटात दाखवण्यात आलेले वीर मावळे यांना इतर चित्रपटात गुंड दाखवतात असं दाखवल्यासारखं दिसत असल्याचं ते म्हणाले. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. सदर प्रकरणात मी महाराष्ट्र, केंद्र सरकार, सेन्सॉर बोर्डाशी बोलायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर, चित्रपटाच्या कागदपत्रांत छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र, संभाजीराजेंशी कोणीही चर्चा केली नसल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे मी यावरून कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Dnyaneshwar:

View Comments (0)