चेकवर चक्क अल्बर्ट आइन्स्टाइनची सही!

बुद्धिमान शास्त्रज्ञ व्यवहारी ज्ञानाबाबत बेफिकीर असतात. त्यांना ते समजत नाही असा समज असतो. मात्र, अल्बर्ट आइन्स्टाइन याने दाखविलेली व्यावहारिक चातुर्याची ही झलक खरोखरच कौतुकास्पद आहे.

तो बायकोसोबत खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेला. सतत संशोधनात गुंतलेला किंवा व्याख्यानाच्या निमित्ताने जगभर हिंडणारा नवरा आज शॉपिंगला सोबत आला म्हटल्यावर बायकोने आज जरा ढिल्या हातानेच खरेदी करायला सुरुवात केली. बिल द्यायची वेळ आली तेव्हा या जगप्रसिद्ध नवर्‍याने दुकानदाराला चेक दिला. तेव्हा बायकोच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन् दंडाला धरून बाजूला घेत कानात कुजबुजली, ‘‘अहो, मोठ्या ऐटीत चेक दिला, पण तुमच्या अकाउंटमध्ये तेवढे
पैसे आहेत का?’’

अगोदरच पिंजारलेले केस अन् त्यात हात फिरवत, डोळे विस्फारत तिच्याकडे बघत तो गोड हसला. पण पैसे आहेत का नाहीत याचे उत्तर काही दिले नाही. घरी येत असताना बायकोच्या डोक्यात अनेक प्रश्न उभे राहिले की, ‘नवरा आपला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असला तरी कधीकधी याला घरी यायचा रस्ता माहीत होत नाही. असल्या विसरभोळ्या नवर्‍याच्या अकाउंटला खरंच पैसे
असतील का?

नसतील तर दुकानदार यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करेल का? बरं पैसे असतील तर आजपर्यंत माझ्यापासून का लपवले असतील. एक ना अनेक विचार करीत ती बाई आपल्या नवर्‍याला प्रश्न विचारून भंडावून सोडत होती.
शेवटी तो म्हणाला, ‘‘अगं, माझ्या अकाउंटला पैसे असले काय अन् नसले काय, काही फरक नाही पडणार. कारण तो दुकानदार हा चेक बँकेतच टाकणार नाही.’’

आता मात्र तिला चक्कर यायची तेवढी बाकी राहिली होती. ‘आ’ वासून नवर्‍याकडे बघत राहिली.
तेव्हा तो म्हणाला, ‘‘अगं वेडे, त्या चेकवर अल्बर्ट आइन्स्टाइनची सही आहे आणि माझी सही असलेला तो चेक दुकानदार बँकेत टाकणार नाही. पण फ्रेम करून दुकानात मात्र नक्की लावेल.’’ अन् खरंच तसं घडलं…!

Prakash Harale: