मुंबई | Alia Bhatt’s Post In Discussion – बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट सोबत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसंच भारतीय पौराणिक कथांवर आधारित या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. चित्रपटातील सर्वच कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्रपटाच्या प्रमोशन करत आहेत.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर-आलिया आणि या चित्रपटाच्या टीमने शनिवारी आय.आय.टी. मुंबईला भेट दिली. या कार्यक्रमामध्ये आलियाने याच चित्रपटातील ‘केसरियाँ’ हे लोकप्रिय गाणं गायलं. तसंच शेजारी बसलेल्या रणबीरने टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं.
आलियाने आय.आय.टी भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच हे फोटो शेअर करत तिने हटके कॅप्शन देखील दिलं आहे. ‘आय.आय.टी. मुंबई.. आम्ही आलो!!! प्रमोशनच्या निमित्ताने का होईना मी आय.आय.टी. मध्ये होते (एका तासासाठी) हे अभिमानाने सांगू शकेन. 9 सप्टेंबर – ‘ब्रह्मास्त्र’, असं कॅप्शन तिनं दिलं आहे.