अभिनेत्री आलिया भट्टसाठी आजचा दिवस खास आहे. आज ती बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे. वास्तू बंगल्यात दोघांनी सात फेरे घेतले आहेत. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्टला ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर आज दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. रणबीर आलियाच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. लग्नानंतर आलिया-रणबीरने एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 17 एप्रिल रोजी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे रिसेप्शन होणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यासाठी कडक सुरक्षा करण्यात आली होती. हे देखील पाहायला मिळाले.
पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नबंधनात अडकले. सध्या आलिया आणि रणबीरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. आलिया आणि रणबीरचा ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नानंतर लगेचच दोघेही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. तर हनिमूनला स्वित्झर्लंडला जाणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.