पुणे नगरविकास परिषदेत तज्ज्ञांचा सूर
पुणे : सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि आयटी इंडस्ट्रीचे शहर यासह अन्य क्षेत्रांतील वैशिष्ट्यांमुळे पुण्याची ओळख आहे. पुण्याकडे येणाऱ्यांचा लोंढा मोठा आहे. परिणामी शहर दिवसेंदिवस फुगत आहे. अशावेळी नगरासह उपनगरांचा विकास कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक वाहतूक, वीज आणि पाणी या मूलभूत पायाभूत सुविधांसह अन्य गोष्टींची उपलब्धता गरजेची आहे. बांधकामे होताहेत, पण पायाभूत सुविधा नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे या शहरात राहणारा सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून नगरविकासाचे नियोजन गरजेचे आहे. विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धन यावरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर ‘पुणे नगर विकास परिषदे’त (पुणे अर्बन डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह) व्यक्त झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस सुरेंद्र पठारे यांच्या संकल्पनेतून पुणे नगरविकास परिषदेचे (पुणे अर्बन डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले होते. पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या या परिषदेत पत्रकारिता, उद्योग, बांधकाम, शिक्षण, संशोधन, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून झाले.
‘टेक्नॉलॉजी फॉर अर्बन डेव्हलपमेंट, फ्युचर मोबिलिटी, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर’वर भाजपच्या पायाभूत सोयीसुविधा विभागाचे अध्यक्ष मंदार देवगावकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अधिष्ठाता प्रा. अर्चना ठोसर, ‘चितळे बंधू’चे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे, जावडेकर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर यांनी, तर ‘रोल ऑफ मीडिया इन पुणे अर्बन डेव्हलपमेंट’वर सम्राट फडणीस, संजय आवटे, श्रीधर लोणी, सुनील माळी यांनी विचार मांडले.
सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “पुढील पाच वर्षात पुण्याचा चेहरा बदललेला दिसेल. शहराच्या विकासात युवक सक्रिय भूमिका घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे. नियोजनाला कृतीची, अंमलबजावणीची जोड आवश्यक आहे. शहराच्या विकासाचा विचार करताना सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाहतूक यावरही अधिक भर हवा.”
जगदीश मुळीक म्हणाले, “शहराचा विकास म्हणजे पाणी, रस्ते, वीज एवढ्यावरच मर्यादित न राहता पुढचा विचार करावा. यासाठी केवळ सरकार किंवा यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकांनी पुढे येऊन हातभार लावायला हवा. शहराच्या विकासात हातभार लावला तर त्यातून देशाचाही विकास होणार आहे. लोकसहभाग ही मोठी ताकद आहे.’
राजेश पांडे म्हणाले, ‘धोरण ठरले की, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आमचे असते. पण ही चर्चा केवळ चर्चेच्या पातळीवर न थांबता त्यातून निष्कर्ष निघून त्याचे अंमलबजावणीत रूपांतर झाले पाहिजे. पुण्याची खरी ओळख जपत दूरदृष्टी ठेवून विकासाचे नियोजन व प्रत्यक्ष कृती गरजेची आहे.’
परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सुरेंद्र पठारे म्हणाले, ‘नगरविकासावर आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा विशेष भर आहे. त्यामुळे शहराच्या विकासात लोकांचा, तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाची याहून अधिक चांगली भेट काय देता येईल, असा विचार करून या परिषदेचे आयोजन करण्यात आले.’
नदीसुधार प्रकल्प राबवावा
मुळा-मुठा नदी शहराचा आत्मा आहे. नदीसुधार प्रकल्पातून त्या सुरक्षित व सुशोभित करून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे. शहराच्या विकासासाठी पीएमआरडीए, महापालिका व स्मार्ट सिटी यांनी एकत्रित काम करावे, असे मत मंदार देवगावकर यांनी व्यक्त केले.