शिंदे गटाच्या आमदाराची मंत्रालयासमोर भाईगिरी?, बांगरांनी केलेल्या शिवीगाळावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Ambadas Danve On Santosh Bangar – शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी हिंगोलीमध्ये कामगार विभागाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या उपहारगृहात राडा घातला होता. उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला त्यांनी कानशिलात लगावली होती. त्यानंतर हिंगोलीमध्ये पीक विमा कंपनीच्या कार्यालयात त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. तसंच आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण संतोष बांगर यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे.

27 ऑक्टोबर रोजी संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असताना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांना थांबवून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्यानं संतप्त झालेल्या बांगर यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तर आता तू मला शिकवणार का? असं म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यानं घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र बांगर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

यासंदर्भात ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली. “मी कोणतीही शिवीगाळ केली नाही. तसंच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नाही. गरज पडल्यास गार्डन गेटवर असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून घ्यावी”, असं बांगर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत आता ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“संतोष बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. यावर, मला मुख्यमंत्र्यांनी कोणतीही समज दिलेली नसून, त्या सर्व बातम्या चुकीच्या होत्या असं प्रत्युत्तर बांगर यांनी दिलं आहे.

Sumitra nalawade: